आपल्या डोक्यात दडलेलं अद्भुत विश्व: मानवी मेंदूची रहस्यमय दुनिया

रात्री मी आरशासमोर उभा होतो आणि आरशात पाहताना मला अचानक एक अत्यंत विचित्र प्रश्न पडला

“माझ्या आतून बाहेर नक्की कोण पाहत आहे?

”मी, म्हणजे माझे हे शरीर?

की माझ्या कवटीत सुरक्षित बसलेला तो साधारण १.४ किलोचा मांसाचा गोळा ?

की या मेंदूमध्ये निर्माण होणारे माझे विचार, आठवणी, भावना आणि ‘मी’ असल्याची जाणीव?

जसजसा मी या विषयाच्या खोलात गेलो, तसतशी मला अशी काही उत्तरे मिळाली, ज्यांनी माझी झोपच उडवली.

आज मला माझा हाच दृष्टिकोन, अस्वस्थ करणारा प्रवास आणि या अद्भुत यंत्राची काही अशी रहस्ये मांडायची आहेत, जी वाचल्यावर तुम्ही स्वतःकडे पुन्हा कधीच जुन्या नजरेने पाहू शकणार नाही.

प्राणी आणि माणसातला तो एक फरक

तुम्ही कधी विचार केलाय, आपण इतर प्राण्यांपेक्षा एवढे वेगळे का आहोत?

पृथ्वीवर असंख्य प्राणी आहेत. ते अन्न शोधतात, धोका ओळखतात, शिकतात, संवाद साधतात आणि आपल्या पिल्लांची काळजी घेतात.

मग माणसामध्ये असे काय आहे, ज्यामुळे त्याने भाषा निर्माण केली, कविता लिहिल्या, शहरं उभी केली, धर्म आणि संस्कृती निर्माण केली, विज्ञान विकसित केले इतकंच नाही, तर ज्या मंगळाकडे तो आकाशातील फक्त एक लाल ठिपका म्हणून पाहत होता, त्याच मंगळावर पोहोचण्यासाठी त्याने यंत्रेही पाठवली. पण हा सगळा चमत्कार नेमका कुठून आला?

यामध्ये आपल्या मेंदूच्या अत्यंत विकसित आणि गुंतागुंतीच्या रचनेची, विशेषतः Neocortex ची, महत्त्वाची भूमिका आहे.

मेंदूचा हा भाग विचार, भाषा, नियोजन, कल्पनाशक्ती आणि अनेक गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियांमध्ये सहभागी असतो.

याच क्षमतेमुळे आपण फक्त वर्तमान क्षणात जगत नाही.

आपण भूतकाळाचा पश्चात्ताप करतो.

भविष्याचे स्वप्न पाहतो.

कविता रचतो.

नाती जपतो.

अजून अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची कल्पना करतो.

आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे—आपण स्वतःच्या विचारांबद्दलसुद्धा विचार करू शकतो.

एक माणूस स्वतःलाच विचारू शकतो—

“मी विचार करतोय, पण हा विचार करणारा ‘मी’ नक्की कोण?”

कदाचित इथूनच माणसाच्या मेंदूचे सर्वांत मोठे रहस्य सुरू होते.

मेंदू नक्की काम कसा करतो? एक आभासी वास्तव (VR Show)

समजा, तुम्ही टेबलावर ठेवलेल्या एका गरम चहाच्या कपाला हात लावला. तुम्हाला चटका बसतो आणि तुम्ही लगेच हात मागे घेता.

पण या छोट्याशा घटनेच्या मागे तुमच्या शरीरात किती अविश्वसनीय प्रक्रिया सुरू झाल्या आहेत, याची आपल्याला कल्पनाही नसते.

हात, डोळे, कान हे फक्त बाहेरील जगाची माहिती गोळा करणारे ‘सेन्सर्स’ (Sensors) आहेत.

कपाला स्पर्श केल्यावर हातातील नसा विजेच्या वेगाने एक सिग्नल तुमच्या अंधाऱ्या कवटीत बसलेल्या मेंदूकडे पाठवतात. मेंदू तो सिग्नल डिकोड करतो आणि ‘वेदना’ (Pain) नावाची भावना निर्माण करून तुम्हाला हात मागे घ्यायला लावतो.

म्हणजे हाताला प्रत्यक्ष इजा होऊ शकते; पण त्या इजेचे ‘वेदना’ म्हणून अनुभव निर्माण होण्यामध्ये मेंदूची महत्त्वाची भूमिका असते.

जर एखाद्या भागातून मेंदूकडे जाणारे signals योग्य प्रकारे पोहोचले नाहीत, तर त्या भागाला इजा झालेली असूनही वेदनेची जाणीव कमी किंवा वेदनेची जाणीव हि होतच नाही.

आणि इथेच एक आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो—

बाहेरच्या जगात प्रकाशाच्या विविध तरंगलांबी आहेत.

हवेतील कंपन आहेत.

वस्तूंमधून येणारी माहिती आहे.

जणू आपल्या अंधाऱ्या कवटीच्या आत एक अदृश्य VR शो सतत सुरू आहे. आपण जगाला थेट स्पर्श करत नाही. आपला मेंदू जगाकडून आलेल्या संकेतांपासून त्याचा अनुभव तयार करतो.

मग प्रश्न असा पडतो की —

आपण जग जसे आहे तसे पाहतोय, की मेंदूने तयार केलेले जग पाहतोय?

मेंदू आणि मन: ‘Hardware’ आणि ‘Software’चा खेळ

जैविक मेंदू आणि डिजिटल नेटवर्कमधील संबंध दर्शवणारे दृश्य
मेंदूची रचना आणि मनातील विचार, आठवणी व भावना यांचा संबंध आजही अनेक प्रश्न निर्माण करतो.

आपण बऱ्याचदा मेंदू आणि मन हे शब्द एकाच अर्थाने वापरतो. पण दोघांकडे थोडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल.

मन (Software): तुमच्या विचारांना वजन आहे का? तुमच्या बालपणीच्या आठवणीचे वजन किती आहे? तुमच्या आईचा चेहरा आठवताना त्या आठवणीने तुमच्या मेंदूमध्ये नेमकी किती जागा व्यापली? आपण विचार, आठवणी आणि भावना हाताने पकडू शकत नाही. म्हणून मेंदूला Hardware आणि मनाला Software म्हणणे ही समजून घेण्यासाठी केलेली एक सुंदर उपमा आहे.

पण

मन म्हणजे स्वतंत्रपणे चालणारे software आणि मेंदू म्हणजे त्याचा computer, असे विज्ञानाने सिद्ध केलेले नाही.

आपल्या मानसिक अनुभवांचा मेंदूशी अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि इथेच एक मोठे रहस्य उभे राहतं.

अब्जावधी पेशी, त्यांच्यातील signals आणि chemical reactions यांच्या गुंतागुंतीतून ‘मी’ असल्याची जाणीव कशी निर्माण होते?

आजही consciousness म्हणजेच चेतना हा neuroscience मधील सर्वांत मोठ्या प्रश्नांपैकी एक आहे….

तुम्ही खरोखर जगताय, की ‘ऑटो-पायलट’ मोडवर आहात?

सकाळी अलार्म वाजतो.तुम्ही उठता, फोन हातात घेता, नोटिफिकेशन्स पाहता, चहा किंवा कॉफी घेता. दररोजच्या त्याच मार्गाने जाता, काम करता, घरी येता, फोन पाहता, टीव्ही पाहता आणि झोपता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच.

आता स्वतःला एक विचित्र प्रश्न विचारा….

यातील किती गोष्टी तुम्ही आज जाणीवपूर्वक निवडल्या?

आणि किती गोष्टी फक्त सवयीने केल्या?

आपल्या दिवसातील अनेक कृती सवयी, शिकलेले patterns हे स्वयंचलित मेंदूच्या प्रक्रियांमुळे सहज घडतात.

यामुळे मेंदूला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी पुन्हा विचार करावा लागत नाही.

पण यामुळे आपण अनेकदा जीवन अनुभवण्याऐवजी फक्त रुटीन पूर्ण करत राहतो.

एखाद्यावर अचानक राग येणे किंवा अचानक जुनी आठवण जागृत होणे— हे सगळे आपल्या मेंदूत आधीपासून असलेल्या पॅटर्न्समुळे घडते.

उद्या सकाळी एक छोटा प्रयोग करून पाहा.

फोन हातात घेण्यापूर्वी फक्त एक सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा—“मला खरंच फोन पाहायचा आहे, की माझी सवय मला फोनकडे घेऊन जात आहे?”

राग आला तर विचारा—“मी राग निवडला आहे की माझी प्रतिक्रिया आपोआप बाहेर आली?

कदाचित तुम्हाला जाणवेल की आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपण पूर्ण जाणीवपूर्वक चालवत नाही.

विचार मी करतो, की विचार माझ्यात निर्माण होतात?

हा प्रश्न आणखी विचित्र आहे. समजा तुम्ही शांत बसला आहात आणि अचानक तुमच्या मनात एखादा विचार आला—“मला उद्या त्या मित्राला फोन करायला हवा. ”तुम्ही त्या विचाराला येण्यासाठी आधी आदेश दिला होता का?

बहुतेक वेळा नाही.

विचार अचानक येतात.

आठवणी अचानक जाग्या होतात.

एखाद्या व्यक्तीची आठवण अचानक येते.

कधी एखादे उत्तर बराच वेळ सापडत नाही आणि अचानक—

“अरे! उत्तर हे आहे!”

असे जाणवते.

मग प्रश्न पडततो,

विचार निर्माण होतो की आपला मेंदू विचार निर्माण करतो आणि आपण त्याची जाणीव करून घेतो?

याचे पूर्ण उत्तर विज्ञानाकडे अजूनही नाही.

पण एवढे नक्की आहे की आपल्या जाणीवपूर्वक अनुभवापेक्षा कितीतरी अधिक neural processes मेंदूमध्ये सतत चालू असतात.म्हणूनच ‘मी’ आणि ‘माझा मेंदू’ यांच्यातील नाते अजूनही विज्ञान आणि तत्त्वज्ञानासाठी मोठे कोडे आहे.—

तुमचा मेंदू तुम्हाला नेहमी सत्य दाखवतोच असे नाही!

आता आरशासमोर उभे राहून स्वतःकडे पाहा.

तुम्हाला वाटते की तुम्ही स्वतःला पाहत आहात.

पण प्रत्यक्षात प्रकाश तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो, retina वर पडतो आणि तिथून मिळालेली माहिती मेंदूपर्यंत पोहोचते. त्यानंतर मेंदू त्या माहितीवर प्रक्रिया करून तुम्हाला दृश्य अनुभव देतो.

म्हणूनच optical illusions आपल्याला सहज फसवू शकतात.

कधी एखादी स्थिर वस्तू हलताना दिसते.

कधी एकाच रंगाच्या वस्तू वेगळ्या रंगाच्या वाटतात.

कधी आपल्या डोळ्यांसमोर मोठा बदल होऊनही तो आपल्या लक्षात येत नाही.

याचा अर्थ डोळे आपल्याला खोटे सांगतात असा नाही.

तर आपला अनुभव हा डोळ्यांनी जमा केलेली माहिती + मेंदूने केलेली प्रक्रिया यांचा परिणाम आहे.

विचार आणि दृश्य अनुभवावर प्रक्रिया करणारा मानवी मेंदू
आपण जे पाहतो ते केवळ डोळ्यांनी दिसत नाही; त्यामागे मेंदूची प्रक्रिया आणि अर्थ लावण्याची क्षमता असते.

म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा

“मी जे पाहतो ते वास्तव आहे, की माझ्या मेंदूने तयार केलेले वास्तवाचे एक मॉडेल?”

आणि जर असे असेल, तर आणखी एक प्रश्न—

“दोन माणसं एकाच घटनेकडे पाहून दोन वेगवेगळे अनुभव का घेऊ शकतात?”

कदाचित आपण फक्त जग पाहत नाही, आपला मेंदू त्या जगाला अर्थ लावत असतो.

तरुणांसाठी ‘Brain Hacking’: मोबाईल की करिअर? योग्य निर्णय कसा घ्यावा?

भूक आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत जैविक गरजा आहेत. पण आजच्या काळात आपल्या मेंदूसमोर एक वेगळे आव्हान आहे—

अमर्याद माहिती आणि अमर्याद मनोरंजन.

आजकालचे तरुण अभ्यासाऐवजी किंवा कामाऐवजी मोबाईलवर तासन् तास Reels का स्क्रोल करतात?

यामध्ये Dopamine ची भूमिका आहे.

Dopamine ला फक्त “आनंदाचे रसायन” म्हणणे योग्य नाही.

ते motivation, reward learning आणि एखाद्या गोष्टीकडे आपले लक्ष वळवण्यासारख्या प्रक्रियांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते.

जेव्हा तुम्ही सतत नवीन video पाहता, notification मिळते किंवा काहीतरी अपेक्षेपेक्षा वेगळे मिळते, तेव्हा मेंदूच्या reward-related systems मध्ये प्रक्रिया सुरू होतात.

एक video संपतो.

पुढचा लगेच सुरू होतो.

मग आणखी एक.

आणि आपल्याला कळतही नाही की अर्धा तास कधी गेला.

म्हणून सोशल मीडिया फक्त “वाईट” आहे असे म्हणण्यापेक्षा त्याची रचना आपल्या मेंदूच्या reward आणि attention systems वर कशी परिणाम करू शकते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

जेव्हा तुम्हाला महत्त्वाचे काम सोडून मोबाईल हातात घेण्याची इच्छा होईल, तेव्हा एक सेकंद थांबा आणि स्वतःला सांगा—

“मला आत्ता खरंच हे करायचे आहे का, की माझ्या मेंदूला तात्काळ reward हवा आहे?”

तुमच्या मेंदूला काय सोपे आहे ते हवे असू शकते.

पण तुमच्या दीर्घकालीन ध्येयाला काय योग्य आहे, हे तुम्हाला ठरवावे लागते.

आपल्या मेंदूला गुलाम बनवण्याऐवजी त्याला योग्य सवयींचे प्रशिक्षण देणे कदाचित अधिक महत्त्वाचे आहे.—

मृत्यूचा विसर आणि अमर्याद लालसा

माणसाला एक विचित्र गोष्ट माहीत आहे—एक दिवस आपण मरणार आहोत. ही जाणीवच कदाचित मानवी जीवनातील सर्वांत खोल प्रश्नांपैकी एक आहे.आपल्याला माहीत आहे की शरीर कायमचे नाही.

तरीही आपण संपत्ती जमा करतो.

नाव कमावतो.

घर बांधतो.

पुढच्या पिढीसाठी योजना करतो.

आपल्या आयुष्यापेक्षा पुढे टिकणाऱ्या गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

कदाचित म्हणूनच अमरत्वाची कल्पना मानवाला हजारो वर्षांपासून आकर्षित करत आली आहे.

आज विज्ञान aging, रोग, brain-computer interfaces आणि मानवी क्षमतांच्या मर्यादांवर संशोधन करत आहे. Neuralink सारख्या brain-computer interface तंत्रज्ञानामुळे मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवाद साधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.

पण आजच्या घडीला मेंदूतील संपूर्ण व्यक्तिमत्त्व किंवा चेतना संगणकात transfer करून अमर होणे ही सिद्ध झालेली गोष्ट नाही. ती अजूनही भविष्याच्या कल्पनांच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात आहे.

पण समजा भविष्यात असे काही शक्य झाले तर?

तुमच्या मेंदूतील आठवणी, तुमचे विचार, तुमचे व्यक्तिमत्त्व आणि तुमच्या आयुष्याचा डिजिटल ठसा एखाद्या यंत्रात जतन झाला…

तर त्या डिजिटल अस्तित्वाला खरोखर “तुम्ही” म्हणता येईल का? की तो फक्त तुमच्यासारखा विचार करणारा एक नवीन अस्तित्व असेल?

‘यथा पिंडे तथा ब्रह्मांडे’ — Microcosm to Macrocosm

हजारो वर्षांपूर्वी भारतीय तत्त्वज्ञानात सांगितले होते

“यथा पिंडे तथा ब्रह्मांडे.”

म्हणजे शरीरातील सूक्ष्म जग आणि विशाल ब्रह्मांड यांच्यात काही प्रकारचे साम्य किंवा प्रतिबिंब आहे.

मेंदूच्या मज्जासंस्थेसारखे दिसणारे ब्रह्मांडातील गॅलक्सीचे जाळे.
यथा पिंडे तथा ब्रह्माण्डे” — मेंदूच्या न्यूरॉन्स आणि ब्रह्मांडाच्या रचनेतील अद्भूत साम्य.

आधुनिक विज्ञानातही एक अतिशय रोचक निरीक्षण समोर आले आहे.

मानवी मेंदूतील neurons चे जाळे आणि विश्वातील cosmic structures यांच्या रचनेत काही network-level साम्य आढळल्याचे संशोधनात मांडले गेले आहे.

याचा अर्थ मानवी मेंदू आणि संपूर्ण विश्व एकच गोष्ट आहेत, असा वैज्ञानिक निष्कर्ष मात्र नाही.

पण कल्पना नक्कीच विलक्षण आहे.

आपल्या कवटीच्या आत असलेले अब्जावधी पेशींचे जाळे…

आणि अब्जावधी प्रकाशवर्षे पसरलेले विश्व…

दोन्हींकडे पाहताना आपल्याला network सारख्या रचना दिसू शकतात. आणि मग एक सुंदर तात्त्विक प्रश्न निर्माण होतो—

“आपण या ब्रह्मांडाकडे पाहणारे जीव आहोत, की ब्रह्मांड स्वतःलाच समजून घेण्यासाठी आपल्या डोळ्यांतून पाहत आहे?”

हा प्रश्न विज्ञानापेक्षा तत्त्वज्ञानाच्या जवळ जातो.

पण कदाचित म्हणूनच तो इतका सुंदर आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का? मेंदूबद्दलच्या थक्क करणाऱ्या गोष्टी

🧠 मेंदूला स्वतःला वेदना जाणवत नाहीत

मेंदूच्या tissue मध्ये वेदना जाणवण्यासाठी आवश्यक pain receptors नसतात. म्हणून काही विशिष्ट प्रकारच्या brain surgery मध्ये रुग्णाला जागे ठेवून त्याच्याशी बोलणे आणि त्याच्या प्रतिक्रिया तपासणे शक्य असते.

⚡ मेंदू सतत ऊर्जा वापरत असतो

तुम्ही झोपलेले असलात तरी मेंदू बंद होत नाही.

तो सतत काम करत असतो.

मानवी मेंदू साधारण २० वॅटच्या आसपास ऊर्जा वापरतो, म्हणून “मेंदू एका छोट्या बल्बइतकी ऊर्जा वापरतो” अशी तुलना केली जाते. पण तुमचे विचार म्हणजे फक्त विजेच्या लहरी नाहीत. त्यामागे electrical आणि chemical दोन्ही प्रकारचे neural signaling असते.

💧 मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते

मेंदू मोठ्या प्रमाणात पाण्याने बनलेला आहे आणि शरीरातील पाण्याचे संतुलन त्याच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.पाण्याची कमतरता झाली तर लक्ष, मूड आणि cognitive performance वर परिणाम होऊ शकतो.

🧠 मेंदूची Memory Pen Drive सारखी नसते

जर मेंदूला एक Pen Drive मानले, तर त्याची memory नेमकी इतक्या GB आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण मानवी memory ही computer storage सारखी नसते.आठवणी neurons मधील connections आणि neural networks मध्ये होणाऱ्या बदलांशी संबंधित असतात.

आणि कदाचित याच गोष्टीमुळे memory आणखी रहस्यमय बनते.

तुमच्या बालपणीचा एक वास अचानक तुम्हाला २० वर्षे मागे कसा घेऊन जातो?

एखादे गाणे ऐकले आणि अचानक एखादी विसरलेली व्यक्ती आठवते कशी?

काही आठवणी आपण विसरतो, तर काही आयुष्यभर आपल्यासोबत राहतात…का?

आपण आठवणी जपतो की आठवणीच आपल्याला घडवत असतात…..?

एक अंतिम विचार

विश्वाकडे पाहणारी व्यक्ती आणि चेतना व अमरत्वाचे प्रतीक
जर मृत्यूवर मात करून अमरत्व मिळाले, तर माणसाला जीवनाचा खरा आनंद तितकाच जाणवेल का?

जसजसा मी या अथांग गुंतागुंतीचा विचार करतो, तसतसे मला जाणवते की, माझा मेंदू स्वतःला जगवण्यासाठी माझ्या शरीराचा एका ‘वाहनासारखा’ (Vehicle) वापर करत आहे.

तो मला भूक निर्माण करतो, जेणेकरून मी अन्न खावे आणि त्या अन्नातून त्याला काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळावी.

तो मला भीती दाखवतो, जेणेकरून मी सुरक्षित राहावा आणि तो जिवंत राहावा.

तो मला वेदना जाणवून देतो, जेणेकरून मी धोक्यापासून दूर जावे.

पण त्याच बदल्यात, तो मला अत्यंत सुंदर आणि मोलाची गोष्ट देतो—

ती म्हणजे ‘मी पणाची जाणीव’ (Consciousness).

तो नसता, तर या अथांग ब्रह्मांडाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी माझ्याकडे मनच नसते.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आरशात स्वतःचा फोटो पाहाल, तेव्हा स्वतःला नक्की आठवण करून द्या…

तुम्ही तो बाहेरून दिसणारा चेहरा नाही आहात; तुम्ही त्या चेहऱ्याच्या आत बसलेला एक अद्भुत, जिवंत संगणक आहात, जो स्वतःच स्वतःला पाहण्याचा आणि समजून घेण्याचा आनंद घेत आहे.

पण विचार करा…

जर भविष्यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेंदूने खरोखरच मृत्यूवर मात केली आणि अमरत्व मिळवले, तर त्या कधीही न संपणाऱ्या, कृत्रिम आयुष्यात माणसाला जगण्याचा खरा आनंद उरेल का…

की तो स्वतःच बनवलेल्या एका डिजिटल तुरुंगात कायमचा अडकेल?

काय वाटते तुम्हाला…..


संदर्भ: NCBI, PubMed आणि Frontiers in Physics मध्ये प्रकाशित वैज्ञानिक संशोधन व संबंधित अभ्यास.

Leave a Comment